Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लेडीज इक्वलिटी रनच्या टी-शर्ट व पदकांचे अनावरण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ मार्च रोजी लेडीज इक्वलिटी रनचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकास आयोजकांतर्फे टी-शर्ट, पदक व प्रमाणपत्र मिळणार आहे. टी-शर्ट व पदकाचे जाहीर प्रकटीकरण कार्यक्रम नुकताच शहरात घेण्यात आला.

 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या रम्या कन्नन, उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, स्पर्धेचे मुख्य प्रयोजक गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील, भेल कंपनीचे प्रतिनिधी रोहित अग्रवाल, हॉटेल मल्हारचे संचालक प्रमोद धनगर, वरिष्ठ रेल्वे अधिकारी जी आर अय्यर  व विवियन रॉड्रीकस , स्पर्धेच्या सदिच्छादूत विद्या बेंडाळे , प्रवीण फालक उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातील प्रवीण फालक, डॉ. नीलिमा नेहेते, प्रवीण वारके, डॉ चारुलता पाटील, संजय भदाणे व श्रीकांत नगरनाईक यांनी अतिथींचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या व विविध उपक्रमाद्वारे मदत केलेल्या व्यक्ती व संस्थांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये गोदावरी फाउंडेशन, भेल इंडिया लिमिटेड, हॉटेल मल्हार, योगेश पाटील, बी एम ज्वेलर्स, राहुल पाटील, विद्या बेंडाळे  यांचा समावेश होता.

 

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद असून लेडीज रनसाठी घेत असलेल्या सरावसत्राबद्दल पोलीस अधीक्षक यांनी आनंद व्यक्त केला.  पोलीस प्रशासनातर्फे आवश्यक ती  सर्व मदत आयोजकांना दिली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.  आधी महिलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत होता परंतु आता तो काळ नसून त्यांनी आरोग्यासाठी संघर्ष करावा व स्वतःसाठी वेळ द्यावा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

 

त्यानंतर रम्या कन्नन यांनी अतिशय मार्मिक शब्दात महिला धावपटूंना प्रोत्साहित केले. एखाद्या महिलेने धावायचे म्हटल्यास पुरुष धावपटूच्या तुलनेत मुलांची काळजी, पतीचा जेवणाचा डबा, परिवारातील इतर सदस्यांच्या  आरोग्याची काळजी या विविध आघाडीवर तयारी करून मग ती धावायला निघते, त्यामुळे धावणाऱ्या सर्व महिलांचे त्यांनी कौतुक केले. शिवाय या रनमध्ये १० किमी धावणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी श्री सोमनाथ वाकचौरे यांनी या रनसाठी पोलीस प्रशासनाची तयारी पूर्णत्वास असून धावपटूंसाठी दीड तास रस्त्याची एक बाजू पूर्णपणे मोकळी असेल असे सांगितले. डॉ केतकी पाटील यांनी महिला दिनानिमित्त होणाऱ्या रनला शुभेच्छा दिल्या व मुख्य प्रायोजक म्हणून सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. त्यानंतर प्रवीण फालक यांचे अध्यक्षीय  भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ चारुलता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रवीण वारके, डॉ वर्षा वाडिले, प्रशांत वंजारी, प्रदीप माळी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version