लेखनशैली सुधारण्यासाठी पुस्तकांना जवळ करा — डॉ.माधव कदम

चोपडा: : प्रतिनिधी । लेखन शैली सुधारण्यासाठी पुस्तकांना जवळ करा. पत्र लेखनातून आदर व जिव्हाळा जपला पाहिजे. मजकूर , संवादात्मक, सोपा, समर्पक, संक्षिप्त वाटणारा व परिपूर्ण बोलणारा हवा. पत्र लेखनाचा प्रभाव समोरच्यावर पडायला हवा , हा कानमंत्र डॉ.माधव कदम यांनी चोपड्यातील विध्यार्थ्यांना दिला .

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित व्हावे यादृष्टीने ‘अर्ज लेखन व पत्र लेखन-स्वरूप व तंत्र’ या विषयावर ‘ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते.

या ‘ऑनलाईन कार्यशाळेच्या’ अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी होते. उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, सौ. एम. टी. शिंदे, प्रा.डॉ.माधव कदम (जी.टी.पी.कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार), डॉ.अक्षय घोरपडे (कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, जामनेर) ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, अर्ज व पत्र लेखन कौशल्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे कारण त्यातूनच लेखन कौशल्य वृद्धिंगत होऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकसित होते.

या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ.अक्षय घोरपडे ‘अर्ज लेखन – स्वरूप व तंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले अर्जलेखन हा व्यक्तीमत्वाचा आरसा असतो. भाषेला अमूर्त करण्यासाठी मानवाने लेखनाचा शोध लावला. अर्जलेखन ही एक कला असून त्याचे लेखन तटस्थ राहूनच करावे लागते. कार्यालयाशी प्रभावी संवाद साधावयाचा असेल तर आपल्याला कार्यालयीन कौशल्य आत्मसात करावे लागते. अर्जाची भाषा सोपी, समर्पक असावी तसेच त्या भाषेत नम्रता व जिव्हाळा असला पाहिजे. अर्जातील माहिती वस्तुस्थितीला धरून लिहायला हवी.असेही ते म्हणाले

या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘पत्र लेखन-स्वरूप व तंत्र’ या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ.माधव कदम म्हणाले की, पत्रलेखन हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. पत्र लेखनातून जिव्हाळा व्यक्त होतो. पत्राचे वेगवेगळे संकेत असतात. पत्रातील प्रत्येक शब्द मोठा आशय व्यक्त करतात. पत्रलेखन हा मानवाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पत्र मानवाचे आंतरिक विचार व्यक्त करतात. पत्रामुळे आठवणींना जीवंतपणा येतो.

प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, पत्र व अर्ज लेखन हे विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. आधुनिक काळात लेखन कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितावह आहे. विद्यार्थ्यांनी आपले लेखन सुधारायला हवे. अर्ज लेखन हा लेखनाच्या कौशल्याचा भाग आहे, म्हणून उत्तम लेखन हा व्यक्तिमत्वाचा भाग होऊ शकतो. मजकूर उत्तम हवा तरच अर्ज लक्षवेधक होतो. कारण अर्ज लेखन हा व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम. एल. भुसारे यांनी केले आभार सौ.एम.टी.शिंदे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जी.बी.बडगुजर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content