Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाळ ग्रंथीच्या गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णाला मिळाले जीवदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये लाळग्रंथीशी संबंधित गंभीर आजारावर अत्यंत गुंतागुंतीची व डॉक्टरांचे वैद्यकीय कौशल्य पणाला लावणारी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

सदरहू रुग्णाला यशस्वीपणे उपचार करून गुरूवार दि. १५ सप्टेंबर रोजी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

जळगावतील विशाल कॉलनी येथील रहिवासी रमेश पुंजाजी तलवारे (वय ५४) या व्यक्तीला चेहऱ्याच्या डाव्या बाजूला सारखा त्रास होत होता. गेल्या चार वर्षापासून तो आजारी होता. डावी बाजू डोक्यापासून हनुवटीपर्यंत दुखत होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आणले असता डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या.

तपासण्या केल्यानंतर त्याला लाळग्रंथी संदर्भात आजार झाल्याचे दिसून आले. चेहऱ्याच्या मुख्य चेतासंस्थांमध्ये या आजारामुळे इजा होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे भविष्यात चेहरा विद्रूप होऊ शकतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय शल्यचिकित्सा विभागाने घेतला. शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि धोका असणारी होती.

मात्र शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे वैद्यकीय कौशल्य पणाला लावून सलग तीन तास यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याला वैद्यकीय पथकाच्या निगराणी खाली ठेवण्यात आले.

अखेर गुरुवारी रोजी रुग्ण पूर्व पदावर आल्यावर त्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीमध्ये निरोप देण्यात आला. शस्त्रक्रिया करण्याकामी डॉ. मारोती पोटे, डॉ.संगीता गावित, डॉ.रोहन पाटील, डॉ.सागर कुरकुरे, डॉ. विपीन खडसे यांच्यासह बधिरीकरण शास्त्राचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, शस्त्रक्रिया गृहातील इन्चार्ज सिस्टर नीला जोशी, कक्ष क्रमांक ७ च्या इन्चार्ज सिस्टर महाजन यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version