लालबागचा राजा गणेश मंडळाकडून गणेशोत्सवाचा कार्यक्रम रद्द ; ११ दिवस साजरा करणार आरोग्योत्सव

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा केवळ ‘आरोग्योत्सव’ साजरा करणार असल्याची घोषणा लालबाग राजाच्या मंडळाने केली आहे.

 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. अशात गणेशोत्सवात गर्दी टाळणे शक्य नाही. त्यामुळेच, लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 87 वर्षांपासून लालबागमध्ये गणेशोत्सवाची परंपरा आहे. केवळ मुंबई आणि देशच नव्हे, तर परदेशातून सुद्धा भाविक लालबागच्या दर्शनासाठी येतात. पण, पहिल्यांदाच मूर्ती स्थापना आणि विसर्जनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे करोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Protected Content