Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लसीकरण प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सरकारने कोरोना लसीकरण प्रमाणपत्र ऑनलाइन माध्यमांवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे. या प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्या व्यक्तीचे  नाव, वय अशी माहिती असते या आधारे सायबर गुन्हेगार फसवणूक करु शकतात

 

देशभरामध्ये आधीच कोरोनाचं संकट असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढलं आहे. लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झालीय. त्यामुळेच सायबर गुन्हेगारीही वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळेच एका चुकीच्या पोस्टमुळे सायबर गुन्हेगारांच्या हाती माहिती लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. देशातील नागरिकांनी अधिक स्मार्टपणे ऑनलाइन माध्यमांवर सजग रहावे म्हणून सरकारकडूनही वेळोवेळी सूचना आणि इशारे देण्यात येतात. सरकारने नुकताच करोना लसीच्या प्रमाणपत्रासंदर्भात असाच एक इशारा दिलाय.

 

कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून लसीकरणाचं प्रमाणपत्र दिलं जातं. यामध्ये लसीकरणासंदर्भातील महितीबरोबरच इतर महत्वाची माहितीही असते. हे प्रमाणपत्र भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लस घेतल्याचा पुरावा म्हणून कामी येऊ शकतं. कोवीन आणि आरोग्य सेतूवरुन हे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येतं.

 

सरकारने सोशल नेटवर्किंगसंदर्भातील सूचना देण्यासाठी सुरु केलेल्या सायबर दोस्त या ट्विटर हॅण्डलवरुन हे प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत या सोशल दोस्त ट्विटर हॅण्डलचा कारभार पाहिला जातो.

 

 

प्रमाणपत्र आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर अपलोड करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं काही काळापासून दिसून येत आहे. एक मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने अशा फोटोंची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच भविष्यात या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टचा त्रास होऊ नये म्हणून सरकारकडून हा इशारा देण्यात आलाय.

 

Exit mobile version