Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करण्याची योगीची तयारी

लखनौ वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली आहेत. योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

“लव्ह जिहाद” च्या घटना रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लव्ह जिहाद रोखण्यासाठी प्रसंगी कायदा संमत करण्याची तयारी असल्याची भूमिका त्यांनी बोलून दाखवली. मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यासाठी बळजबरीने किंवा छळ करून स्त्रीयांचे धर्मांतरण होते.

कानपूर, मेरठ आणि नुकत्याच झालेल्या लखीमपुर खेरीसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व घटनांनामध्ये महिलांना धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याचा पुरावा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटना रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. गरज भासल्यास कायदाही केला जाईल असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले. योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

“हा सामाजिक विषय आहे. हे थांबविण्यासाठी, गांभीर्याने घेतले पाहिजे. आरोपींविरोधात कारवाई होण्याची गरज आहे आणि आम्हाला कठोरपणे वागले पाहिजे. या घटनांची जलदगती न्यायालयात सुनावणी करता येईल. या आरोपींना जामीन मिळू नये.” असे अतिरिक्त मुख्य गृहसचिव, अवनीशकुमार अवस्थी यांनी सांगितले.

Exit mobile version