Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लव्ह जिहादविरोधी कायदा महाराष्ट्रातही करा

 

अहमदनगर: : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेत राज्य सरकारपर्यंत संघटनेचे म्हणणे पोहोचवण्याची विनंती केली आहे.
उत्तर प्रदेशात एका अध्यादेशाद्वारे ‘लव्ह जिहाद’ कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच हा कायदा महाराष्ट्रातही लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली असून तसे निवेदनही संघटनेने प्रशासनाला दिले.

‘देशासह महाराष्ट्रात प्रेमाच्या नावाखाली मुलींना, महिलांना लग्नाचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कार, तसेच बळजबरीने धर्मांतर या सारख्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक हिंदू मुलींचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. काही मुली समोर येऊन तक्रार करतात. त्यावेळी त्यांना धमकावणे, दबाव टाकणे असेही प्रकार होतात. तर अनेक मुली बदनामीचा धाकामुळे व अश्लील चित्रीकरण सार्वजनिक करण्याच्या धमकीमुळे अन्याय सहन करतात. महाराष्ट्र ही संतांची, छत्रपती शिवरायांची भूमी आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे कठोर कायदा महाराष्ट्र सरकारने सुद्धा करावा,’ असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष हभप अभिषेक महाराज जाधव यांच्यासह पदाधिकारी हभप संदीप महाराज जरे, कारभारी गव्हाणे, हभप राम महाराज पठाडे, हभप शंकर महाराज भागवत, सुरेखा सांगळे, हभप विष्णु महाराज पिठुरे, स्वप्नील लाहोर आदींच्या सह्या आहेत.

Exit mobile version