Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रॉबर्ड वाड्रा यांची आयकर खात्याकडून चौकशी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयकर विभागाचं एक पथक धडकलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा ठपका ठेवत प्रकरणी आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस पाठवली होती. मात्र, ते आयकर कार्यालयात चौकशीसाठी आले नव्हते. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारीच वाड्रा यांच्या घरी दाखल झाले असून त्यांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

साऊथ ईस्ट दिल्लीतील सुखदेव विहार येथील वाड्रा यांच्या कार्यालयात त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं जात आहे. बिकानेर आणि फरिदाबाद येथील जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने त्यांची चौकशी सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोना महामारीमुळे वाड्रा हे आयकर विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले नव्हते. त्यामुळे त्यांची आज चौकशी केली जात आहे.

, यापूर्वीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडूनही त्यांची चौकशी सुरू आहे. लंडनमधील ब्रायंस्टन स्क्वेअर येथील एका संपत्तीच्या खरेदीत मनी लाँड्रिंगच्या आरोपांसंबंधी हे प्रकरण आहे. ही संपत्ती 19 लाख पाऊंडमध्ये खरेदी करण्यात आली होती आणि या संपत्तीचे मालक रॉबर्ट वाड्रा असल्याचा दावा केला जातोय. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सध्या फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारीची चौकशी सुरु आहे. याच चौकशीतून मनोज अरोराचीही भूमिका समोर आली, ज्याच्या आधारावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असा आरोप केला जातो, की लंडनमधील ही संपत्ती संजय भंडारीने 19 लाख पाऊंडमध्ये खरेदी केली होती आणि 2010 मध्ये तेवढ्याच किंमतीला विकली. तर दुसरीकडे याच संपत्तीच्या डागडुजी आणि इतर कामावर 65 हजार पाऊंडचा खर्च करण्यात आल्याचं बोललं जातं. तरीही खरेदी केलेल्या रक्कमेतच ही संपत्ती रॉबर्ट वाड्रा यांना विकण्यात आली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे.

Exit mobile version