रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल, अॅण्ड्रीया गेज यांना भौतिक शास्त्रातील नोबेल

 

स्टॉकहोम: वृत्तसंस्था । यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अॅण्ड्रीया गेज यांना जाहीर करण्यात आला आहे. लहान कणांपासून ते अंतराळातील संशोधनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिले जातात.

रॉजर पेनरोज यांनी सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताच्या साहाय्याने कृष्णविवराच्या निर्मिती भविष्य वर्तवता येऊ शकते असे संशोधनातून दाखवून दिले. गेंजेल आणि गेज यांनी आकाशगंगेचे रहस्य उलगडून दाखवण्यासाठी केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. रॉयल स्वीडिश अॅकडेमी ऑफ सायन्सचे सचिव जनरल होरान हॅनसन यांनी पुरस्काराची घोषणा केली. सुवर्ण पदक आणि ११ लाख डॉलरहून अधिक रक्कम पुरस्कार स्वरुपात दिली जाते.

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील २०२० चा नोबेल पुरस्कार हार्वे अल्टर, मायकल होउगटन आणि चार्ल्स राइस यांना जाहीर करण्यात आला आहे. या शास्त्रज्ञांना हिपाटायटिस सी विषाणूच्या शोधासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नोबेल पुरस्कार जगभरात प्रतिष्ठेचा समजला जातो. हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

Protected Content