Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांनाही धान्य मिळावे यासाठी आमदार चौधरी प्रयत्नशील

 

यावल, प्रतिनिधी । देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करून दिड महिन्यापासून अधिक काळ लोटला आहे. या कालावधीत रोजगार बंद असल्याने अनेकांना पोटाची खळगी भरणे अवघड झाले आहे. अशा गरीब कुटुंबांना शासन रेशन देत आहे. मात्र. ग्रामीण भागात अजूनही ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना प्रतीक्षा करावी लागत असून त्यांना लवकरात लवकर धान्य मिळावे यासाठी आमदार शिरीष चौधरी हे प्रयत्नशील आहेत.

हिंगोणा गावात व तालुक्यातील इतर गावांमध्ये ज्या शीधापत्रिकाधारक कुटंबांना महिन्याला प्रत्येकी पाच किलो तांदूळ शासनाकडून मोफत सुद्धा धान्य मिळाले आहे. ज्या ग्रामस्थांकडे केशरीरेशन कार्ड आहे परंतु धान्य मिळत नाही अशा ग्रामस्थांना सुद्धा शासनाकडून धान्य मिळत आहे. परंतु, ज्या कुटुंबाकडे रेशन कार्डच नाही अशी कुटुंब आजही धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. तलाठी दिपक गवई, हिंगोणा गावातील कोतवाल सुमन आंबेकर, पोलीस पाटील दिनेश बाविस्कर व रेशन दुकानदार यांनी हिंगोणा कार्यक्षेत्रातील मोर धरण, काळा डोह, विटवा वस्ती तसेच शेती शिवारात फिरून या आदिवासी कुटुंबांची ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही अशा २०० आदिवासी व इतर कुटुंबांची यादी करून या कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालय यावल येथे यादी पाठवण्यात आली आहे. परंतु मागील १ महिना होउन देखील या कुटुंबांना उद्यापर्यंत धान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे यात बहुतेक आदिवासी पावरा, बारेला कुटुंब असल्याने यांना धान्य लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

प्रत्येकांना धान्य मिळणार. आदिवासी विकास विभागाकडे जे  नागरिक मजूर काम करीत आहे. त्यांना देखील धान्याचा लाभ कसे देता येईल याचे प्रयत्न करू असे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले आहे.

एनजीओमार्फत धान्य पोहचविणार
सध्या तातडीची मदत म्हणून अशासकीय प्रयत्न सुरू असून एनजीओ मार्फत धान्य पोहोचवले जाईल व त्यांचे रेशन कार्ड बनवून त्यांना धान्याचा कायमचा लाभ कसा देता येईल याचे प्रयत्न करू असे यावलचे तहसिलदार जितेंद्र कुँवर यांनी सांगितले.

Exit mobile version