Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन आता अवघ्या २,२०० रुपयांत देणार

पुणे वृत्तसंस्था ।  सिप्ला कंपनीच्या ‘रेमडेसिव्हीर ‘ इंजेक्शनची किंमत कमी झाली असून, आता अवघ्या २,२०० रुपयांत ते कोरोना रुग्णांना उपलब्ध होणार आहे. या इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० रुपयांवरून बाविसशेपर्यंत कमी केल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण खात्याने जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व सरकारी, खासगी रुग्णालयांना पाठविले आहे. पुणेकरांसाठी रेमडेसिव्हीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार असून, त्याचा साठा कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे.

माजी आमदार मोहन जोशी यांनी देशमुख यांची तातडीने भेट घेऊन पुण्यातील इंजेक्शनच्या तुटवड्याकडे त्यांचे लक्ष वेधले. त्या वेळी देशमुख यांची वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्याशी या प्रश्नाबाबत चर्चा झाली.

‘पुण्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्याने डॉ. लहाने यांनी चार उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधला. त्या वेळी कंपन्यांकडे एक लाख व्हायल इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी आवश्यकतेनुसार ७२ तासांपूर्वी ऑर्डर नोंदविल्यास इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन उत्पादकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना दिले आहे,’ अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. लहाने यांनी या बैठकीत सिप्ला कंपनीने १०० मिलिग्रॅम ‘रेमडेसिव्हीर’च्या इंजेक्शनची किंमत ५,४०० वरून सुमारे २,२०० रुपयांपर्यंत कमी केल्याचे पत्र जारी केल्याची माहिती दिली. .

Exit mobile version