‘रेमडेसिविर’ला सेवाग्राम रुग्णालयाकडून अन्य पर्याय

 

 

नागपूर : वृत्तसंस्था । तुटवडा आणि काळ्याबाजारामुळे चर्चेत आलेले  ‘रेमडेसिविर’ औषध देणे बंद करण्याचा निर्णय सेवाग्रामच्या रुग्णालयाने घेतला असून अन्य औषधांमार्फत कोरोना रुग्णांवर उपचार  केले जाणार आहेत

 

कोरोनावर रेमडेसिविर हे इंजेक्शन रामबाण असल्याचे गृहीत धरून उपचार होत आहेत. मात्र तसे नसल्याचे राज्याच्या कोरोना कृतिदलाने पूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीही रेमडेसिविरच्या मागणीत काहीच फरक पडला नाही.सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या समर्पित कोविड रुग्णालय म्हणून दर्जा मिळालेल्या कस्तुरबा रुग्णालयात १५ दिवसांपासून रेमडेसिविर देणे बंद करण्यात आले आहे. या औषधाची शासनाकडे मागणी करावी लागते. तशा मागणीपत्रावर स्वाक्षरी करण्यास वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री यांनी स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. हृदयासाठी ते मारक असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अनुदानप्राप्त या रुग्णालयास अत्यंत माफक दरात औषधे उपलब्ध होतात. पण तरीही औषधाचा मारा न करण्याचे तत्त्व पाळणाऱ्या या रुग्णालयाने आता रेमडेसिविरबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे.

 

या औषधाचे नियोजन करणारे उपजिल्हाधिकारी नितीन पाटील म्हणाले की, सेवाग्रामच्या रुग्णालयाने काही दिवसांपासून रेमडेसिविरची मागणी नोंदवलेली नाही.  याबाबत रुग्णालयाची भूमिका स्पष्ट असल्याचे पाटील यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी डॉ. कलंत्री यांनी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात रेमडेसिविरचा आग्रह धरू नये असे म्हटले होते.

 

रेमडेसिविर कुप्यांमुळे रुग्ण बरा होतो किंवा गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही किंवा फुप्फुसातील संसर्ग कमी करतो, हा जनतेतील समज चुकीचा आहे. या औषधाचा हट्ट धरू नये. वैद्यकीय क्षेत्रात यापेक्षा उपयुक्त इतरही औषधे आहेत. असे नमूद करीत या औषधाखेरीज अन्य उपायांनी रुग्ण पूर्णपणे बरे केल्याचा दावा येथील वैद्यकीय अधीक्षकांनी केला आहे.

 

डेक्सा, इनोक्सा किंवा तत्सम औषधे तसेच प्रतिजैवके देऊन उपचार केले जात असल्याचे सेवाग्राम रुग्णालयातील एका डॉक्टरने नमूद केले. या रुग्णालयाने सुरुवातीपासूनच रेमडेसिविरचा अत्यंत अपवादात्मक स्थितीत वापर करण्याची भूमिका घेतली होती. या औषधाखेरीज उपाय करून रुग्ण बरे केले जाऊ शकतात, यावरच त्यांनी भर दिला होता.

 

Protected Content