Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रूग्णसेवा बंद ठेवू नका : शरद पवारांचे डॉक्टरांना आवाहन

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील अनेक हॉस्पीटल्स अणि दवाखान्यांमध्ये रूग्णसेवा बंद करण्याच्या तक्रारी आल्या असून आपत्तीच्या या क्षणांमध्ये रूग्णसेवा बंद करू नका असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉक्टरांना केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. याप्रसंगी शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या प्रतिकारासाठी कार्यरत आहेत. यात पोलीस, आरोग्य व वैद्यकीय खात्याचे कर्मचारी आदींसह अनेक घटकांचा समावेश आहे. देशात सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी अनेक जण याचे पालन करतांना दिसून येत नाहीत. मी स्वत: लॉकडाऊनचे पालन करत असून घरामध्येच बसलेलो आहे. वाचनारख्या बाबींमध्ये माझा वेळ जात असून आपण फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत आहोत. राज्यातील काही हॉस्पीटल्स आणि दवाखान्यांमध्ये रूग्णांवर उपचार करण्यात येत नसल्याची तक्रार समोर आली आहे. यामुळे आपत्तीच्या प्रसंगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रूग्णसेवा करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. त्यांनी राष्ट्रवादी वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या सेवेचे कौतुक केले.

शरद पवार पुढे म्हणाले की, सोशल डिस्टन्सींग हा कोरोनावर अतिशय उपयुक्त ठरणारा उपचार आहे. यामुळे पुढील दोन आठवड्यापर्यंत सर्वांनी घरात बसून राहणे हे अतिशय आवश्यक आहे. कोरोनाचा अतिशय वाईट परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढणार असून याचा प्रत्येकाने वैयक्तीक पातळीवर प्रतिकार करायचा आहे. प्रत्येकाने काटकसरीत जीवन जगणे आवश्यक आहे. यासाठी सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.

Exit mobile version