Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रूग्णवाहिका न आल्याने कोरोना बाधीताचा मृत्यू; आप्तांचा तीव्र रोष

जामनेर प्रतिनिधी । येथील कोरोना बाधीत रूग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर जळगावला नेण्यासाठी रूग्णवाहिका न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरूध्द तीव्र संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. तथापि, आ. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने अखेर संबंधीत मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील जामनेरपुरा येथील रुग्णाचा अहवाल पाँझीटीव्ह आल्यानंतर त्या रुग्णाला आज सकाळी दि.४ जुलै रोजी अकरा वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयात दाखल करण्याची तयारी करण्यात आली. त्यांच्या आप्तांनी शासकीय रुग्णवाहिका बोलवण्याचा प्रयत्न केला. परंतु १०८ क्रमांकावर फोन करुन सुध्दा साडेतीन तासाच्या सुध्दा रुग्णवाहीका आली नाही. परिणामी नाईलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहीका बोलविली. तरीही कोरोनाबाधित रुग्णाला जळगावच्या कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले नाही. त्यामुळे त्या रुग्णाचा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जामनेर उपजिल्हा रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकेत नेतांना रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली.

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक व डाँक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रुग्णाचा बळी गेला असुन रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली . यासाठी रूग्णालयात नातेवाईक जमा होऊन त्यांनी अंत्यसंस्कार थांबवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आ. गिरीश महाजन यांनी नातेवाईकांची समजूत काढल्याने त्यांनी अखेर संबंधीत मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. याप्रसंगी प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरिक्षकांची उपस्थिती होती.

Exit mobile version