Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्यावर मजुरीची वेळ

 

नांदेड : वृत्तसंस्था । एप्रिल २०१७ मध्ये दोन मुलींना बुडण्यापासून वाचवल्याबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित २० वर्षीय नदाफ एजाझ अब्दुल रौफला आर्थिक संकटामुळे  वडिल  भावाप्रमाणे रोजंदारीवर काम करावे लागत आहे.

२०१७ मध्ये पुरस्कार मिळाल्याच्या एका वर्षानंतरच त्याच्यावर अशी वेळ आलीय नांदेड जिल्हय़ातील पार्डी (मक्ता) येथील एजाझने धाडस दाखवून दोन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले होते. त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झाला होता. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या पथसंचलनातही तो सहभागी झाला होता.

“माझ्या बहिणीच्या लग्नासाठी आणि माझ्या अभ्यासासाठी पैसे वाचवण्यासाठी मी २०१९ मध्ये माझ्या वडिलांसह आणि भावाबरोबर मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो आणि केंद्र सरकारने अकरावीच्या माझ्या कॉलेजची फी भरली होती. पण बारावीसाठी, माझे कुटुंब वेळेवर फी भरू शकले नाही आणि म्हणून मला प्रवेश मिळू शकला नाही, ” असे एजाझने सांगितले.

२०२० मध्ये, एजाझने शेवटी एका कला महाविद्यालयात प्रवेश मिळवला आणि या वर्षी १२ वीची परीक्षा ८२ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. एजाझची महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी म्हणून सामील होण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. जिल्हा परिषदेचे अधिकारी मला चांगली नोकरी शोधण्यात मदत करू शकतील, तर मी पदवीपर्यंत माझा अभ्यास करू शकतो. सध्या मी फक्त ३०० रुपये प्रतिदिन मजूर म्हणून काम करतो, ”असे एजाझ म्हणाला.

३० एप्रिल २०१७ रोजी पार्डी गावातील काही महिला व मुली येथील बंधाऱ्यावर कपडे धुन्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणीने पाण्यात उडी घेतली. मात्र, बंधाऱ्यात त्या दोघी बुडायला लागल्या. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण त्यांनाही पोहता येत नव्हते. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून लोक तलावावर मदतीसाठी गेले. या वेळी शेताकडे निघालेल्या एजाझने बंधाऱ्याजवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली. त्याने प्रसंगवधान व धाडस दाखवून पाण्यात उडी घेतली. २० फूट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यू झाला. त्यावेळी एजाझ हा पार्डी येथील राजाबाई हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यलय येथे दहावीत शिकत होता.

एजाझच्या वडील अब्दुल यांनी २०१६ मध्ये होमगार्ड म्हणून कंत्राटी नोकरी गमावली होती. स्थानिक जिल्हा परिषदेने दोन मुलींना वाचवण्याच्या साहसी कृत्याचे कौतुक करण्यासाठी एजाझला क्राउडफंडिंगद्वारे ४०,००० रुपये दिले होते. अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिले होते की एजाझने १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यावर आणि सरकारी योजनेअंतर्गत घर मिळवल्यावर त्याला नोकरी मिळेल असे अब्दुल यांनी सांगितले.

 

Exit mobile version