Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय छात्र सेना व्यक्तिमत्व विकासाचे सर्वोत्तम माध्यम – कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मानवी जीवन अनपेक्षित चढउतार,  सुखदुःख आणि अनगिणत आव्हानांनी ओतपोत भरलेले असतानाच भविष्यातील संकटांना धैर्याने  सामना करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे धडे घेतले पाहिजेत व त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण हे सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. ते 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.

2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान विद्यापीठाच्या हिरवागार डोंगरराशीत एनसीसी चा कॅम्प सुरू आहे.  या कॅम्पमध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून कर्नल पवनकुमार, प्रशासकीय अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे.

यात बटालियन अंतर्गत जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, फैजपूर, सावदा, खिरोदा, पाल, भालोद, किनगाव, वरणगाव, साकेगाव, धरणगाव, जामनेर, शेंदुर्णी, सामनेर, कानळदा इत्यादी शाळा व महाविद्यालयातून ज्युनिअर डिव्हिजन व सीनियर डिव्हिजनचे  एकूण 481 कॅडेट्स सहभागी झाले आहेत.

त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित तज्ञ दिवस रात्र मेहनत करीत आहेत. यासोबतच एकूणच व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सुद्धा तज्ञ मार्गदर्शकाच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून धनाजी नाना महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी  राष्ट्रीय छात्रसेना :  समाज व देश उभारणीसाठी सर्वोत्तम माध्यम या विषयाच्या अनुषंगाने व्यक्तिमत्व विकासावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ? व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू, व्यक्तिमत्व विकासाला प्रभावित करणारे घटक व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेले उपाय यावर सखोल विवेचन केले. यावेळी अनेक प्रसंग, गोष्टी व शेरोशायरी च्या माध्यमातून प्रबोधन केले. उपस्थित कडेटसनी भरभरून प्रतिसाद दिला. या वार्षिक प्रशिक्षण शिबिराला यशस्वी करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील यांच्यासहित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत.

यासोबत कर्नल पवनकुमार, सुभेदार मेजर प्रेमसिंग, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, लेफ्टनंट दीपक पाटील, फर्स्ट ऑफिसर युवराज पाटील, सेकंड ऑफिसर नारायण वाघ, सी टी ओ डॉ दिपाली खडके यांच्यासहित जे सी ओ, एन सी ओ परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version