Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रहितापेक्षा विशिष्ट विचारांना महत्व देण्याने लोकशाही व्यवस्थेची हानी 

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । राष्ट्रहितापेक्षा अधिक महत्व आपल्या विचारधारेला देणे चुकीचे आहे. यामुळेच आमच्या लोकशाही व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले . माझी विचारधारा अशी आहे, म्हणून मी देशहिताच्या बाबतीत देखील माझ्या विचारधारेप्रमाणेच विचार करेन, याच मर्यादेत मी काम करेन असे म्हणणे चुकीचे आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कॅम्पसमधील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण केले. अनावरणानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद अमर रहेच्या घोषणा दिल्या. हा पुतळा राष्ट्राप्रती प्रेम आणि करुणा शिकवेल, प्रेरणा देत राहील असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.

प्रत्येक व्यक्तीला आपल्या विचारधारेचा अभिमान असतो. हे नैसर्गिक देखील आहे. मात्र तरी देखील, राष्ट्रहिताचा विचार करता, आमची विचारधारा राष्ट्राच्या सोबतच असायला हवी, राष्ट्राच्या विरोधात नाही, असे मोदी म्हणाले. तुम्ही देशाचा इतिहास पाहा, जेव्हा जेव्हा देशापुढे कठीण काळ आला, तेव्हा प्रत्येक विचारधारा मानणारे लोक राष्ट्रहितासाठी एकत्र आले. स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात प्रत्येक विचारधारेचे लोक एकत्र आले. त्यांनी देशासाठी एकत्र संघर्ष केला, असेही मोदी पुढे म्हणाले.

जेएनयूमध्ये उभ्या राहिलेल्या या स्वामीजींच्या पुतळ्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळो . स्वामी प्रत्येकामध्ये जे साहस पाहू इच्छित होते ते साहस प्रत्येक व्यक्तीमध्ये या पुतळ्यामुळे निर्माण होवो, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मुख्य आधार असलेल्या करुणेची प्रेरणा सर्वांना मिळो. हा पुतळा आम्हाला देशाप्रती प्रेम शिकवो, असे मोदी म्हणाले.

 

Exit mobile version