Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? — चंद्रकांत पाटील

 

मुंबई : वृत्तसंस्था । अनिल देशमुख यांच्यासंदर्भातील कारवाईबद्दल चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना आज दिल्लीत बोलावले. राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी  मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे, सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

 “तुमच्या गृहमंत्र्यांना महिन्याला १०० कोटींची वसुली हवी आहे, ही बातमी आणि पुरावे डीजी पद असणारा अधिकारी लेखी सादर करत असूनही तुम्ही देशमुखांवर काय कारवाई करावी याची अजून चर्चा करत आहात ? सत्तेची इतकी लालसा आहे की, आपण महाराष्ट्रससुद्धा विकायला तयार झाला आहात ?” असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून केले आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असेल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “शरद पवार यांची भूमिका हास्यास्पद असून आठवीच्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल, की हे सरकार पवार चालवतात. त्यामुळे न समजणारी पहिल्या सारखी दुधखुळी जनता राहिलेली नाही, यामुळे हे सर्व नाटक बंद करा.”

“सध्याची परिस्थिती आणि राजकारणातील ५४ वर्षांचा प्रवास लक्षात घेता. शरद पवार यांच्याकडून अशी अपेक्षा नाही, त्यांची पक्षावरील पकड हळूहळू कमी होत चालली आहे. हे धनंजय मुंडे किंवा अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून दिसून येत आहे. या दोन्ही नेत्यांवर आरोप होऊन देखील त्यांचा राजीनामा का घेत नाही? यापूर्वी ज्या मंत्र्यावर आरोप झाले त्या नेत्यांचा शरद पवारांनी राजीनामा घेतला आहे. मग आता असं का होतं नाही?” असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, “आम्ही आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन केले. येत्या आठवड्याभरात राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.”

Exit mobile version