Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना लस घेतली

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीमध्ये आर्मी हॉस्पीटल रिसर्च अ‍ॅण्ड रेफ्रल म्हणजेच आर. आर. रुग्णालयामध्ये कोरोनाची लस घेतली.

 

एक मार्चपासून देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. याच तिसऱ्या टप्प्यामध्ये ७५ वर्षीय कोविंद यांनी आज लसीचा पहिला डोस घेतला आहे.

 

देशामध्ये ५० लाखांहून अधिक पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सहा लाख ४४ हजार नागरिकांना पहिल्या दिवशी वेळ देण्यात आला. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रावादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासारख्या नेत्यांनीही लस घेतली. मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनी लस घेतली.

 

लसीकरण मोहीमेच्या या टप्प्यात आमदार, खासदारांचाही समावेश करण्यात आला आहे. लशींवर आक्षेप घेण्यापेक्षा विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव तसेच, अन्य विरोधी पक्षनेत्यांनी लशींच्या सुरक्षिततेबाबत शंका घेतली होती. राज्यसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तातडीने लसीकरण करण्यास नकार दिला असून तरुणांनी आधी लसीकरण केले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

 

. तिसरी चाचणी न झालेल्या देशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या वापरास परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीकाही झाली होती. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून आक्षेप नोंदवले होते.

Exit mobile version