Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावसाहेब दानवे यांची महाविकास आघाडीवर टीका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महाविकास आघाडीचा जन्मच मुहुर्तावर झालेला नाही,  अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली

 

सध्या महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. आघाडीतला पक्ष काँग्रेस सध्या स्वबळाची भाषा करू लागला आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही आलबेल नाही अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

 

रावसाहेब दानवे यांनी  पीकविम्याची मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस व  राष्ट्रवादीमधल्या संवाद-विसंवादाबद्दल दानवे म्हणाले, एकतर महाविकास आघाडीचा जन्मच काय मुहुर्तावर झालेला नाही. आणि त्यामुळे जन्माला आल्यापासूनच त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे वाद अगदी सुरुवातीपासूनच आहेत. कधी वादळ येतं, कधी ते शमवलं जातं. पण पुन्हा ते वादळ येतंच.

 

काँग्रेसच्या स्वबळाच्या मुद्द्यावर रावसाहेब दानवे म्हणतात, आता काँग्रेस स्वबळाची भाषा करत आहे. पण देशात काँग्रेसची सरकारं किती याचा काँग्रेसवाल्यांनी विचार करायला हवा आणि ते जरी स्वबळाची भाषा करत आहेत तरी दुसऱ्यांनी पोटात दुखून घेण्याचं काय कारण आहे? कारण ते सरकार एकत्र चालवतात. त्यांनी पक्ष एकमेकांमध्ये विलीन नाही केलेत. सरकार एकत्र चालवतात, पक्ष मात्र वेगळे चालवतात. मग जर तसं असेल तर त्यांना आपापले पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग आता येणाऱ्या निवडणुका एकत्र लढायच्या का स्वबळावर लढायच्या हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

 

राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार स्वबळाचा नारा देत मनातील खदखद व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आहेत.

 

 

 

Exit mobile version