Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावसाहेब दानवेंना पटोले , अब्दुल सत्तारांचे प्रत्युत्तर

 

औरंगाबाद : वृत्तसंस्था । राहुल गांधी यांच्यावर गावंढळ भाषेत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे

 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा बदनापुरात पोहोचली. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केली. दानवे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, दानवे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

 

एखाद्या देवाला आपण गोरं सोडतो ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? असा प्रश्न दानवेंनी विचारला. त्यावेळी सांड असं उत्तर उपस्थितांकडून देण्यात आलं. ते काय करतं त्याला म्होरकी नसती, त्याला वेसण नसती. त्याला ठिकाणाही नसतो कुठं बांधायचं झालं तर. कारण त्याला मालकच नसतो. ते कुणाच्याही शेतात जातं आणि खातं. शेताचा मालकही म्हणतो जाऊद्या खाऊद्या, ते तरी कुठं जाईल खायला. आणि खाऊन मग कसा लठ्ठ्या होतो, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय.

 

दानवे यांच्या टीकेनंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलय. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खरं म्हणजे जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय, असा टोला दानवे यांना लगावला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दानवेंवर टीका केलीय. अशा प्रकारचं वक्तव्य करायचं आणि त्यातून लोकांचं मनोरंजन करायचं. पण रिकामं पोट मनोरंजन घडवू शकत नाही. आज बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई आहे. या सगळ्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका पटोले यांनी केलीय.

 

दानवे यांनी काल जालन्यात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिक आणि महिलांसाठी विविध योजना आणल्या. 1980 ला मी 5 हजार रुपयात गॅस विकत घेतला होता. पण आज मोदींमुळे 100 रुपयांत गॅस कनेक्शन मिळत आहे. मोदींनी शेतकऱ्यांना युरियाच्या बॅगमागे 1 हजार 250 रुपये सबसिडी दिली. राज्यात मात्र अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे. आम्ही रस्त्यावर उतरुन कोरोना काळात काम केलं. पण मुख्यमंत्री घरात बसून म्हणतात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, असा जोरदार टोला दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता.

 

Exit mobile version