Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम मंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । हिंदुत्व ही एकाच पक्षाची मक्तेदारी नसल्याचा टोला मारत राम मंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्‍न असल्याचे मत प्रदर्शन शिवसेनेने आज सामनाच्या अग्रलेखातून केले आहे.

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अयोध्या दौर्‍यावर जात आहेत. या पार्श्‍वभूमिवर, सामनाच्या अग्रलेखात याच विषयावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने रामराज्य सुरू झाले त्यास शंभर दिवस झाले. हे सरकार शंभर तासही चालणार नाही असे दावे जे ऐंशी तासवाले करीत होते, त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसांत बरेच काही करून आणि घडवून दाखवले. त्यामुळे शंभर दिवसांचे संचित घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जात असतील व श्रीरामाच्या चरणी कार्याची फुले अर्पण करणार असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा कोणत्याही मतलबाशिवाय आहे. महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या अशा भिन्न विचारधारेचे लोक एकत्र आले व त्यांनी सरकार स्थापन केले. हे सरकार देशाच्या घटनेनुसारच चालले आहे. अशा सरकारचे नेतृत्व ठाकरे करीत असल्यामुळे ते आता अयोध्येस कसे जाणार? श्रीरामाचे दर्शन कसे घेणार? असे पाणचट प्रश्‍न राज्यातील विरोधकांनी विचारले. आता उद्धव ठाकरे हे अयोध्येस पोहोचत आहेत. त्यामुळे विरोधकांची साफ पंचाईत झाली. सरकार कोणाच्याही पाठिंब्याने चालत असले तरी श्री. उद्धव ठाकरे व शिवसेना आतून-बाहेरून जशी होती तशीच आहे. विचार आणि भूमिकेत कोणतेही बदल झाले नाहीत. प्रभू श्रीराम किंवा हिंदुत्व ही काही एकाच पक्षाची जहागिरी नाही. अयोध्येचा राजा हा सगळ्यांचाच आहे.

यात पुढे म्हटले आहे की, काही जण सदैव विरोधाचा कापूस पिंजत बसतात. त्या पिंजण्यातून ना धागा बनतो, ना वस्त्र. अशा मांजरपाटांच्या विरोधाची पर्वा न करता अयोध्येत राममंदिर उभे राहील. राममंदिर हा फक्त धर्माचा आणि राजकारणाचा विषय नव्हता. तो तितकाच राष्ट्रीय अस्मितेचाही विषय आहे. अयोध्या नगरी ही प्रभू श्रीरामाची हे सिद्ध करण्यासाठी देशाला मोठा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षात अनेकांचे खरे दात दिसले, अनेकांचे मुखवटे गळून पडले, पण अयोध्येचे रण लढणा़र्‍यां पाठीशी पहाडासारखे उभे राहिले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. हे राज्य श्रींचे आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचे आहे. ते छत्रपतींच्या न्यायबुद्धीने, तितकेच श्रीरामांच्या सत्य मार्गाने चालेल. जनतेला दिलेल्या वचनांना जागणारी कर्तव्यबुद्धी सरकारच्या विचारात असणे हेच रामराज्य ठरते. हेच राज्य महात्मा गांधींना हवे होते. महाराष्ट्रात त्याच विचारांचे राज्य चालले आहे. ते तसेच चालत राहील. पाठीशी श्रीराम आहेतच! असे यात म्हटले आहे.

Exit mobile version