Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम मंदिरासाठी २.५ हजार कोटींचे संकलन !

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आत्तापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून भारतभरातून जनतेकडून देणग्या स्वीकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर आता अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  

राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, “राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे. लोकांना देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पण येत्या ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल.”

दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणगीची रक्कम अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. “४ मार्चपर्यंत बँकांमध्ये जमा झालेल्या चेकनुसार राम मंदिरासाठी सुमारे अडीच हजार कोटींची देणगी जमा झालेली आहे”, असं विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version