Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामदेव बाबांच्या विरोधात आयएमए आक्रमक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात कोरोनाचं सावट असताना आता योगगुरु रामदेव विरुद्ध आयएमए सामना पाहायला मिळत आहे. योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 

एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. “एक तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी योगगुरु रामदेव यांनी केलेले आरोप मान्य करावे आणि आधुनिक उपचार पद्धती रद्द करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरोधात साथ नियंत्रक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे.

 

‘देश कोरोनाची लढाई लढत आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने उपचार सुरु आहेत. भारत सरकारही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या लढाईत आतापर्यंत १२०० अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी जीव गमवला आहे. असं असताना योगगुरु रामदेव आपल्या व्हिडिओत अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि बिनकामाचं विज्ञान आहे, असं सांगताहेत’, याकडेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.

 

 

 

योगगुरु रामदेव यांनी कोरोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 

यापूर्वीही पतंजलीच्या  कोरोना औषधावरुन वाद झाला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात कोरोनिल हे औषध जारी केले होते. त्या वेळी कोरोनाची साथ जोरात होती.

 

Exit mobile version