Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राफेल विमानाचे सुटे भाग उत्तर प्रदेशात तयार होणार

लखनऊ वृत्तसंस्था :। भारतीय वायुदलात समावेश करण्यात आलेल्या राफेल या लढाऊ विमानाचे सुटे भाग उत्तर प्रदेशात तयार होणार आहेत. यासाठी राफेलचे भाग बनवणारी फ्रान्सची कंपनी ‘थॅलेस’ उत्तर प्रदेशात गुंतवणूकही करणार आहे.

थॅलेस या कंपनीनं आपल्या नवं कार्यालय नोएडामध्ये सुरू केलं आहे. लघु आणि मध्यम उद्योग मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी थॅलेसच्या ‘स्टेट ऑफ आर्ट न्यू कॉर्पोरेट’ कार्यालयाचं डिजीटल पद्धतीने उद्घाटन केलं. हे कार्यालय अगोदर दिल्लीमध्ये होतं. नव्या १.५० लाख चौरस फुटांवर उभ्या राहिलेल्या सहा मजल्यांच्या इमारतीत ११०० कर्मचारी काम करणार आहेत.

थॅलेस कंपनी ‘डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉरिडोर’ अंतर्गत कानपूरमध्ये एमकेयू कंपनीसोबत आर्म्ड फोर्ससाठी नाईट व्हिजन डिव्हाईसही बनवू शकते. यासाठी कंपनीनं प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची सिंह यांनी माहिती दिली.

याशिवाय कंपनी डिजिटल आयडेन्टिटी आणि सिक्युरिटी बिझनेस अंतर्गत इंजिनिअरिंग सेंटर म्हणूनही काम करणार आहे. स्थानिक कौशल्याला प्रोत्साहन देताना उच्च गुणवत्तायुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही उत्तर प्रदेशला ही कंपनी मदत करणार असल्याचं सांगण्यात येतंय.

थॅलेस सध्या देशात एचएएल, भेल, एल अँड टी इत्यादी कंपन्यांसोबत तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत आहे.’थॅलेस’कडून राफेल विमानांसाठी रडार, इलेक्ट्रॉनिक्स व्हॉईस सिस्टम, कॉकपिट डिस्प्ले सिस्टम, पॉवर जनरेशन सिस्टम यांसारखी अनेक उपकरणांची निर्मिती केली जाते.

Exit mobile version