Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राणेंचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न : शिंदे

मुंबई प्रतिनिधी  । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्याबाबत केलेले वक्तव्य हे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया नागरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 

‘जन आशीर्वाद’ यात्रेनिमित्त वसई येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले असून त्यांच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले. तसेच शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील, असे सूचक विधान नारायण राणे यांनी केले. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही”.

 

“नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविल्यापासून आजपर्यंत कधीही त्यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. त्यांच्याच पाठबळामुळे नगरविकास विभागात अनेक चांगले निर्णय घेता आले. तसेच अनेक चांगल्या योजना राबविण्याचे काम सुरू आहे. नारायण राणे ‘साहेब’ हे स्वत: मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना एक नक्कीच माहित असणे अपेक्षित आहे की कोणत्याही खात्याचा धोरणात्मक निर्णय जो राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असतो तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंजूर होत नाही. माझ्याच नव्हे तर कोणत्याही विभागाचे धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा होऊनच घेतले जातात व ते योग्यच आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले. “नारायण राणे हे आता केंद्रीय मंत्री असून त्यांच्या खात्याचे धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधानांच्या संमतीशिवाय नक्कीच मंजूर होत नसावेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.

 

नारायण राणे यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली आहे तर त्यांनी ‘जन आशीर्वाद’ कसा मिळेल याची काळजी घ्यावी त्याऐवजी शिवसेनेत कोण नाराज आहेत आणि कोण कंटाळले आहेत, यावर बोलून त्यांना फुकट वेळ दवडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असा टोला शिंदे यांनी लगावला.

Exit mobile version