राणा दाम्पत्याच्या जामिनासाठी दुपारी होणार सुनावणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज शनिवारी दुपारी अडीच वाजेनंतर राणा दाम्पत्याच्या जामिनासाठी सुनावणी घेण्यात येणार असून त्यांना दिलासा मिळतो कि पुन्हा कोठडी मिळते, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.

खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्या जामिनावर शुक्रवारी होणारी सुनावणी न्यायालयाकडे वेळेअभावी टळली. मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ खाजगी निवासस्थानासमोर खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांचा हनुमान चालीसा पठण आग्रह सामान्य दिसत असला तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्री हिंदूविरोधी असल्याचे भासवून भाजप आणि विरोधी पक्षाशी संगनमत करीत राज्यपालांतर्फे महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याचा कट होता, असा दावा  राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मुंबई पोलिसांकरवी शुक्रवारी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध करताना सादर केला.

तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या राणा दाम्पत्यावरील अटकेच्या कारवाईसाठी संबंधित यंत्रणेच्या मंजुरीचा प्रश्न हा तपास पूर्ण झाल्यावर येतो, असेही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राणा समाजातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर केल्यास ते पुरावे नष्ट करण्याची आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे.

राणा दाम्पत्याने नागरिकांमध्ये द्वेष, शत्रुत्व आणि शत्रुत्वाची भावना निर्माण करीत कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करण्याचा वा संविधानाविरूद्ध असंतोष निर्माण करणारे वक्तव्य केले असून त्याविरुद्ध राजद्रोहाचा आरोप योग्यच आहे, असा दावा करीत पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.

Protected Content