Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राठोड गेले, देशमुख गेले, आता परब यांचा नंबर ; सोमैय्यांच्या दाव्याने खळबळ

 

 

 औरंगाबाद : वृत्तसंस्था । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी मोठे वक्तव्य केले आहे. संजय राठोड गेले , अनिल देशमुख गेले आता अनिल परबही   जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील, अशी स्फोटक प्रतिक्रिया त्यांनी  दिली आहे

 

 

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीयाईकडून केली जाणार आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देशमुख यांनी दिले आहे.

 

या पार्श्वभूमीवर सोमैय्या  या प्रतिक्रियेनंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ते आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

“अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले अनिल परबही जातील. पुढे पुढे पहा या मंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री घरी जाणार आहेत,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

 

शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूनंतर अनेक आरोप केले गेले. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. राठोड यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. विरोध वाढल्यामुळे तेव्हा संजय राठोड यांना  वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अनिल देशमुख यांच्यावर दररोज 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आरोप झाल्यानंतर त्यांचासुद्धा राजीनामा घेण्याची मागणी केली जात होती. यावर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर सातत्त्याने टीका केली होती. ट्वविटर, फेसबुक तसेच अन्य माध्यमांचा वापर करुन त्यांनी अनिल देशमुख तसेच सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांतर आता सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचा उल्लेख करुन तेसुद्धा लवकरच जातील असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

 

किरीट सोमय्या यांनी यानंतरचा नंबर अनिल परब यांचा असणार आहे, असे थेट वक्तव्य परब यांचे नाव घेऊन केले आहे. त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी परब यांचे थेट नाव नेमके का घेतले ?, असा महत्त्वाचा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. दरम्यान, सोमय्या यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version