Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरेही मोदी सरकारवर संतापले

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना संकट हाताळण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे.

 

आता बांगलादेशही आपल्याला सीमा बंद केल्याचं सांगतो अशा शब्दांत राज ठाकरे यांनी केंद्रावर संताप व्यक्त केला आहे.  ‘लोकसत्ता’कडून आयोजित दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.

 

“हे जे काही जगावर संकट आलं त्याची कोणालाच कल्पना नव्हती. फक्त आपणच चुकीच्या अंगाने हाताळलं असं नाही, अमेरिका आणि युरोपमधील देशांकडूनही चुका झाल्या. फक्त ते लवकर वठणीवर आले पण आपण अजूनही आलो नाही. मागच्यास ठेस पुढचा शहाणा तसं आपल्याकडे झालं नाही. इंडियन मेडिकल काऊन्सिलने दुसरी लाट येणार सांगितलं असताना आपला देश अलर्ट राहिला नाही.  राजकारणी, सत्ताधारी अलर्ट राहिले नाही. त्यामुळे २०२० पेक्षा २०२१ भयानक आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

 

“भारतात जाऊ नका असं चित्र जगात निर्माण झालं आहे. बांगलादेशने आपल्याला बॉर्डर बंद केल्याचं सांगावं. बांगलादेशच्या सीमेवरुन हजारो लोक आपल्याकडे आले. ज्यांना आपल्याला अजून काढता येत नाही तो भाग वेगळाच. पण तो देश भारतासाठी सीमा बंद आहे सांगतो,” असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

 

ते म्हणाले की, “यांच्याकडून निघणारी माणसं आम्ही पोसायची आणि हे संकटात तुम्हाला सीमा बंद असल्याचं सागंणार. त्यांनी सीमा उघडली तरी जाणार कोण हा प्रश्नच आहे तसाही. पण याप्रकारे आपल्या देशाची नाचक्की व्हावी यासारखं दुर्दैव नाही. आपण दुसरीकडून धडा नाही घेतला. आम्ही निवडणुका, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो,” अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.

 

“केंद्र आणि राज्य या सगळ्या गोष्टी सुरु होत्या. केंद्र किंवा राज्य असेल…तुमचं घोडं राजकीय पक्षाने मारलं असेल, समाजाने तर मारलं नाही ना. मग अशा परिस्थितीत हे राज्य आपलं नाही ते आपलं असं करुन चालणार नाही. सगळा समाजच आपला आहे,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

“या दिवसात लोकांना ४०, ५० हजाराला इंजेक्शन घ्यावं लागत आहे. रुग्णालयाचं बिल लाखात गेलं आहे. अशी परिस्थिती आजपर्यंत भारतात आजपर्यंत झाली नव्हती,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

 

Exit mobile version