Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरेंच्या इशार्‍यानंतर माहिमच्या ‘त्या’ बांधकामावर हातोडा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत दिलेल्या इशार्‍यानंतर महापालिका प्रशासनाने माहिमच्या समुद्र किनार्‍यावरील वादग्रस्त बांधकाम हटविले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेमध्ये माहिमच्या समुद्राच्या भागामध्ये होणार्‍या अनधिकृत बांधकामाविषयीची माहिती दिली. हे बांधकाम हटविण्यात आले नाही तर एक महिन्यानंतर याच्याच बाजूला गणपती मंदिर बांधण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला होता. या प्रकरणी आजवर कारवाई न करण्यात आल्याने त्यांनी प्रखर टिका देखील केली होती.

दरम्यान, राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर चक्रे फिरली. लगेचच रात्रीत मुंबई महापालिकेने हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक माहिम इथं दाखल झालं आणि पाडकामाला सुरुवात झाली. ताजे वृत्त हाती आले तेव्हा हे बांधकाम पाडण्यात आले होते.

दरम्यान, या कारवाईचा माहीम दर्गा ट्रस्टने निषेध केला आहे. विश्‍वस्त मंडळातर्फे सांगण्यात आले की, राज ठाकरे यांनी सांगितलेली जागा ६०० वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा किल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे. त्या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झालं असेल तर त्यावर सरकारने जरुर कारवाई करावी असंही ते म्हणाले. याबाबत एबीपी-माझा या वाहिनीने वृत्त दिले आहे.

Exit mobile version