Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले

ठाणे प्रतिनिधी । राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत येणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. राज ठाकरेंबाबत सुरु असलेल्या चर्चांवर एबीपी-माझा या वृत्तवाहिनीशी बोलतांना केंद्रीय मंत्री रामदास यांनी म्हटलं की, राज ठाकरे आमच्या सोबत येत असतील तर त्याचं स्वागतच आहे. मात्र ठाकरे यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांना आपल्या पक्षाची भूमिका बदलावी लागेल. त्यांनी प्रांतवादाची भूमिका सोडली तर त्यांचे स्वागत आहे. परप्रांतियांचा त्यांच्या पक्षाकडून होत असलेल्या विरोध त्यांना थांबवावा लागेल. मात्र तरीही राज ठाकरे भाजप सोबत आल्याने भाजपला त्याचा फार फायदा होईल असं वाटत नसल्याचे रामदास आठवले म्हणाले. सीएए-एनआरसीवरुन दिल्लीत जो हिंसाचार उसळला आहेत, यामध्ये ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. दिल्लीतील या हिंसाचाराला काँग्रेस आणि आप जबाबदार आहेत, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. तर सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांनी नियुक्ती करून संजय राऊत यांच्यावर पक्षाने अन्याय केला असल्याचे आठवले म्हणाले. मुंबईत २०२२ नंतर महापौर भाजपचाच असेल, असा विश्‍वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Exit mobile version