Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य सरकार कोरोना मृतांची आकडेवारी लपवत आहे — किरीट सोमय्यां

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य सरकार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे

 

ठाकरे सरकारकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी ठाणे आणि वसईमधील आकडेवारी सादर करत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे.

 

ते म्हणतात की, “१ ते १३ एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा  मृत्यू झाला. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. आयुक्त म्हणतात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, सुधार करु”.

 

“ठाण्यात स्मशानभूमींमध्ये ३०९ जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात ५७ कोरोना मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे”.

 

“शहरातील खासगी रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद पालिकेच्या दैनंदिन अहवालात केली जात नव्हती. या अहवालात केवळ पालिका रुग्णालयांतील मृतांच्या आकड्यांची नोंद होते. मात्र, यापुढे खासगी रुग्णालयांतील मृतांची नोंदही अहवालात करण्यात येईल,” असं स्पष्टीकरण वसई-विरार शहर महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी दिली आहे.

 

महापालिका क्षेत्रामध्ये दीड महिन्यांपासून वाढलेला प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रश़ासनाकडून  उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने शहरात चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच दररोज सरासरी पाच ते सात हजार होणाऱ्या चाचण्यांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून दहा हजारांच्या पुढे गेली आहे. दीड महिन्यापूर्वी एकूण चाचण्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या आत होते. मात्र आता हे प्रमाण ७ टक्क्यांच्या पुढे गेल्याचे दिसून येते.

 

गेल्या वर्षी शहरात दररोज ५ ते ६ हजारांच्या आसपास चाचण्या होत होत्या, मात्र पाच महिन्यांपूर्वी रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली होती. त्या वेळेस दररोज ३ ते ४ हजार चाचण्या होत होत्या.  दीड महिन्यांपासून चाचण्यांची संख्या पुन्हा वाढविण्यात आली आहे. तीन दिवसांपासून शहरात दररोज १० हजारांच्या पुढे चाचण्या होत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

 

Exit mobile version