Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य लोकसेवा आयोगाकडून भाजप धार्जिणा प्रचार रोखा

 

 

मुंबई: वृत्तसंस्था ।  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत  होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ठाकूर यांनी याबाबतचे निवेदन दिले. एमपीएससी परीक्षेचं संघीकरण करण्यात येत असून परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपा धार्जिणा राजकीय प्रचार तसेच काँग्रेस विरोधी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निदर्शनास येत आहे.

 

गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख टाळून आवर्जून मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत सामील करण्यात आला होता. तसेच याच प्रश्नपत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली, असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू स्पष्ट होत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.

 

दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा देत असतात. गेल्यावर्षी परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आले होते. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजवण्यात येत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

 

या राजकीयीकरणाला अभ्यासक्रमापासून दूर ठेवण्याची गरज आहे, तसेच अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  भरती प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पुन्हा अशी अफरातफर झाली तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची गाढवावर बसून धिंड काढू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात राज्य सरकार PSI च्या 605 जागा भरणार असल्याचे नमूद केलं आहे. त्यानुसार NT प्रवर्गासाठी साडेतीन टक्क्याने 22 जागा असणं गरजेचं आहे. पण त्यात फक्त 2 जागा NT प्रवर्गासाठी दिल्या आहे. त्यामुळे उरलेल्या 20 जागा कुठे गेल्या? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे

Exit mobile version