Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  शनिवारी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर  आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे

 

कोरोना  रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याने महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर होत आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला होता. या बैठकीत लॉकडाउनसंदर्भातील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाउन करायचा की कडक निर्बंध लावायचे यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

 

राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव  आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबईतील स्थितीही चिंताजनक असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाउन लावू असा इशारा दिला होता. दोन दिवसात निर्णय घेऊ असं ठाकरे म्हणाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लॉकडाउन संदर्भातील निर्णय होणार असल्याची दाट शक्यता आहे. या बैठकीनंतर त्याची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी दोन सत्रांत उद्योजकांसह प्रसारमाध्यमे, व्यायामशाळा चालक, मराठी नाट्य निर्माता संघ  , मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.  स्वयंशिस्त पाळली असती, तर आजची स्थिती आली नसती. लसीकरणातही आपण सर्वात पुढे आहोत. नुकसान तर पूर्ण राज्याचे होणार आहे. ‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ याप्रमाणे पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलावीच लागतील. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे लागतील.  भीती गेली हे चांगले झाले. पण त्यामुळे बेफिकिरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनबद्दलचे संकेत दिले होते. सरकारच्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती सर्व क्षेत्रातील प्रतिनिधींना केली होती.

Exit mobile version