Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात २३ एप्रिलपासून १२ वी व २९ एप्रिलपासून १० वीची परीक्षा

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मेदरम्यान व दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र यंदा करोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातील प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी चर्चा करून शाळा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ३१ डिसेंबर रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून लेखी परीक्षा ४ मेपासून तर प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून होणार असल्याचं म्हटलं आहे. सीबीएसईची दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ४ मे पासून सुरू होणार असून १० जूनपर्यंत चालणार आहेत. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. परीक्षांनंतर निकालही लगेच जाहीर करण्यात येणार असून १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल. परीक्षांबाबतचा निर्णय विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्व घटकांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जाहीर करण्यात आल्याचे, रमेश पोखरियाल यांनी सांगितले.

जुलैमध्ये निकाल जाहीर झाल्यावर पुढील वर्षीच्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. दरवर्षी मे अखेरीपर्यंत निकाल आणि जूनपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांचे पुढील शैक्षणिक वर्षही लांबणार आहे.

Exit mobile version