Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात १३ विद्यापीठांच्या परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन होणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या कोणत्याही वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे

 

राज्य सरकारकडून नुकतेच कोरोनासंदर्भात नियम लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात  कठोर नियम लागू असणार आहेत. यामध्ये संचारबंदीचा देखील समावेश आहे. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचं नियोजन देखील काहीसं विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे.

 

आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय देण्यात आले होते, विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरू देखील केल्या होत्या. मात्र, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

 

“कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलाय की महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. या परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे”, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

हा निर्णय उद्यापासूनच लागू करण्यात येईल, असं यावेळी उदय सामंत यांनी सांगितलं. “सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण उद्यापासून त्या शक्य नसल्यामुळे सर्वच कुलगुरुंनी सरकारला विनंती केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठांनी घ्यायची आहे. या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्गांच्या परीक्षांचा समावेश असेल”, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Exit mobile version