Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात राष्ट्रपतीं राजवटीची नारायण राणेंची मागणी

 

मुंबई:  वृत्तसंस्था ।  महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, असं भाजप नेते नारायण राणे सांगितलं.

 

अमित शहा यांना दिल्लीत असतानाच तीन दिवसांपूर्वी पत्र लिहून ही मागणी केल्याचंही राणे यांनी सांगितलं.

 

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात आहे. कुणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असं सांगतानाच आज कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही आणि पण भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आल्याचं राणे म्हणाले.

 

 

दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दिशाच्या घरी तिचे काही मित्र गेले होते. त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यातच तिची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्रीही उपस्थित होता, असा दावा करतानाच दिशा सालियन प्रकरणापासून ते सुशांतसिंग ते मनसुखप्रकरणापर्यंतची वाझेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. जेलमधल्या रवी पुजारींच्या स्टेटमेंटवरुन चौकशी झालीय. पुजारीलाही या प्रकरणात काही सांगायचे आहे, असं मी ऐकून आहे. त्यामुळे अजून कुणाच्या हत्या झाल्यायेत का? याची चौकशी व्हावी, असंही राणे यांनी सांगितलं.

 

वाझेंची पोलीस दलात पोस्टिंग कोणी केली. दिशा सालियन प्रकरणातही वाझेंकडे पोस्टिंग कोणी दिली. पोलिस दलात वाझेंचा गॉडफादर कोण आहे? वाझेंना कोण वाचवत आहे, याची माहिती उघड झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

सचिन वाझेंना शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच बेकायदेशीर कामे सुरू आहेत. वाझेंच्या जीवावरच शिवसेनेकडून लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. वाझे आणि शिवसेना नेत्यांचे संबंध आहेत, असा आरोपही त्यांनी केला

Exit mobile version