Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु

 

नागपूर: वृत्तसंस्था । राज्यात पहिल्या टप्प्यातील पोलिसांच्या ५३०० पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असली तरी राज्यात पोलीस भरती होईल. यावेळी अनिल देशमुख यांनी पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. ही गोष्ट त्यांनाही पटल्यामुळे मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया विनासायास पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

पोलीस खात्यात १२५३६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील. २५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

एसईबीसी आरक्षण न देता पोलीस भरती प्रक्रिया राबवली तर मराठा समाजाकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता.

 

Exit mobile version