Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात पुन्हा १५ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाउनची चर्चा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानांमुळे आता राज्यात पुन्हा १५ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाउनची चर्चा सुरु झाली आहे

 

राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले असतानाही अद्याप रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी  दोन दिवसांत मुख्यमंत्री यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती दिली आहे. दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील राज्यात कडक लॉकडाउनची गरज असल्याचं म्हटलं आहे.

 

आज मंत्रीमंडळ बैठक होणार असून यावेळी लॉकडाउनसंबंधी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीत आपण १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

 

“आज ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांची जितक्या प्रमाणात गरज आहे तितकी उपलब्धता नाही. आता विशाखापट्टणम वैगेरे येथून ऑक्सिजन आणावा लागत आहे. मला वाटतं जर १० ते १५ दिवसांचा कडक लॉकडाउन केला तर इतर सगळ्या गोष्टी, साधनसामुग्री एकत्र करण्यास वेळ मिळेल. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपयोग होईल,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

“साखळी तोडणं आणि सुविधा वाढवून लोकांना वाचवणं या दोन मार्गांनी काम केलं पाहिजे. लोक कारणं काढून फिरतातच आहेत. आठ ते दहा दिवसांनी लोकांना काही अडचण होणार नाही. सहा ते आठ महिन्यांचा लॉकडाउन नको. पण १५ दिवसांसाठी केलं तर बरं होईल. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असून आज पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मुद्दा मांडणार आहे,” अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

Exit mobile version