Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात काँग्रेसचे अस्तित्व संपले — राधाकृष्ण विखे पाटील

 

अहमदनगर : वृत्तसंस्था |  “राज्यात काँग्रेसचं अस्तीत्वच राहीलं नाही. राज्यातील सत्तेतही अस्तीत्व नाही. काँग्रेसने आता इशारा देणं सोडून द्यावं. लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा सत्तेबाहेर पडावे” असा खोचक सल्ला भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसली दिला.

 

ते शिर्डीमध्ये बोलत होते. यावेळे त्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं.

 

 

ज्या ग्राहकांनी विजेचे बील भरलेले नाही, अशा ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतलेला आहे. अनेक जिल्ह्यात वीजतोडणीचे कामसुद्धा सुरु झालेले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. यावर बोलताना विखे पाटील यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. “हे सरकार विजतोडणीचे महान कार्य करतंय. अगोदरच राज्यातील जनता आणी शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. राज्य सरकारने मोफत वीज देण्याची घोषणा केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी केली. आज धाकदडपशाहीने, दहशतीने नागरिकांकडून वीजबिलाची वसुली केली जात आहे. हे सरकार आपल्या घोषणा विसरलंय,” अशी टीका विखे पाटील यांनी केली. विजतोडणी त्वरित थांबवली नाही तर सरकारला भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी सरकारला दिला.

 

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. लवकर चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत, अशी घणाघाती टीका विखे पाटील यांनी केली.

Exit mobile version