Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात अनेक ठिकाणी चिंताजनक स्थिती : जयंत पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

आज जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सत्ताधार्‍यांवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्वच आरोप सीबीआयच्या कारवाईनंतर खरे ठरत आहेत. भाजप त्यावेळी समीर वानखेडे यांचे समर्थन करत होते त्यावरुन भाजपचा स्वभाव समजतो. राज्यात शरद पवारसाहेबांनी महाविकास आघाडी निर्माण केली, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमीच विरोधकांचे टार्गेट ठरला आहे. पण अधिक जोमाने काम करण्यासाठी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विशिष्ट दिशा देण्यासाठी, पक्षाच्या बैठकांचे पुढील काळात नियोजन केले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने सूचित केले आहे. हा कालावधी पाच वर्षांची टर्म संपण्यापूर्वीचा असायला हवा. त्यामुळे या कालावधीची व्याख्या विधानसभा अध्यक्ष लवकरच सांगतील अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावतानाच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वेळेत विधानसभा अध्यक्षांकडून अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे गरजेचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

तसेच, आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आलेली नाही. त्यामुळे काहीही संभ्रम निर्माण करु नका. वेळ वाढवून मागितला आहे. ईडीचे कार्यालय आमच्या पक्षाच्या कार्यालयाच्या मागे आहे. त्यामुळे मी ठरलेल्या वेळेत जाणार आहे .त्यानंतर नेमकी कशासाठी नोटीस बजावली आहे हे स्पष्ट होईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version