Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात अडकून पडलेल्या मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी

मुंबई वृत्तसंस्था । ‘कोरोना लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरू होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

याबैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलिस महासंचालक सुबोधकुमार आदींसह संबंधित विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीवापराचे ट्रॅक्टर, हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखिल कम्युनिटी किचन सुरू करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Exit mobile version