Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील हॉटेल्स आणि लॉजेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने ८ जुलैपासून राज्यातील हॉटेल्स आणि लॉजेसना ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तथापि, यात रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कालच हॉटेल्स मालकांसोबत बैठक घेतली होती. यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूतोवाच केले होते. त्यानंतर यासंदर्भात एक नियमावली तयार करण्यात येवून परवापासून म्हणजेच ८ जुलैपासून राज्यातील हॉटेल्स आणि लॉजेसना ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. राज्यभरातील हॉटेल्स आणि लॉजिंग सुरू करण्यात येणार असल्याचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.येत्या ८ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

महानगरपालिका असलेल्या शहरांसाठी वेगळ्या अटी घालण्यात आल्या आहेत,या ठिकाणच्या केवळ कंटेन्मेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेल्सना ही परवानगी दिली गेली आहे. यात हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉजमध्ये ३३ टक्के क्षमतेने ग्राहकांना राहण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. उर्वरित विभागांसाठीदेखील हीच ३३ टक्क्यांची अट लागू होणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित ६७ टक्के क्षमता ही क्वॉरंटाईन करण्यासाठी वापरण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. दरम्यान, हॉटेलच्या दर्शनी भागात कोविड संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शिका या विषयी माहिती देणारे फलक असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच गर्दी टाळण्यासाठी आणि वाहनतळासाठी योग्य व्यवस्था आवश्यक आहे. सामाजिक अंतर राखले जावे अशी बैठक व्यवस्था सुनिश्‍चित करणे बंधनकारक आहे. थर्मल स्क्रिनिंग, सर्वांसाठी सहज निर्जंतुकीकरण द्रव्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. हॉटेल कर्मचार्‍यांसह अतिथींना मास्क, हातमौजे इत्यादी साहित्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. पैशाच्या देवाणघेवाणीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे. लिफ्ट मधील संख्याही नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच वातानुकुलित यंत्रणेसंदर्भात वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. हॉटेलच्या खोल्या स्वच्छ निर्जंतुकरण केलेल्या असणे आवश्यक आहे.

Exit mobile version