Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्याचे नवे उपलोकायुक्त म्हणून संजय भाटीया यांनी घेतली शपथ

मुंबई वृत्तसंस्था । मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटीया यांनी आज राज्याच्या उपलोकायुक्त पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाटीया यांना पदाची शपथ दिली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी भाटीया यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्याला प्रभारी लोकायुक्त डॉ शैलेश कुमार शर्मा, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, राज्य मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भगवत व इतर मान्यवर उपस्थित होते.

भाटिया हे २०१६ सालापासून पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. पोर्ट ट्रस्टच्या जागेचा विकास करण्याकरिता त्यांनी विविध उपक्रम आखले. भाऊचा धक्का ते रेवस मांडवा रोरो सेवा, शिवडी एलिफंटा रोपवे, पूर्व सागर किनारा विकास, सुपरस्पेशालिटी बीपीटी हॉस्पिटलची उभारणी, आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या त्यांच्या कारकिर्दीतच चालना मिळाली आहे

सन १९८५ च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी असलेले भाटीया यांत्रिकी शाखेतील अभियंते असून ऑस्ट्रेलिया येथील सदर्न क्रॉस विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली आहे. आपल्या सेवाकाळात भाटीया यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, विक्रीकर आयुक्त तसेच अध्यक्ष, मराविम या पदांसह अनेक पदे भूषविली आहेत.

Exit mobile version