Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपाल कोश्यारी यांची नियुक्ती रद्द करा

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले असून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघातर्फे राष्ट्रपती यांना निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फेत निवेदन देवून करण्यात आली आहे.

 

 

निवेदनांचा आशय असा की,  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच ” छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळाचे आदर्श आहेत” असे बेताल वक्तव्य केले आहे. यापूर्वी देखील त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , पंडित जवाहरलाल नेहरू व मराठी लोकांविषयी असेच बेताल विधाने केलेले आहेत. एखाद्या राज्याचे राज्यपाल असणाऱ्या व्यक्तीने त्या राज्याची संस्कृती, अस्मिता व सांस्कृतिक बाबी, राष्ट्रपुरुष या सर्व विषयी विषयांची सविस्तर माहिती ठेवणे क्रम प्राप्त आहे. परंतु,  महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची किंचितही जाणीव नाही . तसेच ते जाणीवपूर्वक असे वादग्रस्त वक्तव्य करतात असा महाराष्ट्रातील जनतेला ठाम विश्वास आहे . राज्यपाल यांनी वारंवार राष्ट्रपुरुषांविषयी वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील व देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करून त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केलेले आहे . यामुळेच राज्यपाल व महाराष्ट्र राज्यातील जनता यांच्यात अपेक्षित असणाऱ्या परस्पर विश्वासाच्या व सौहार्दाच्या नात्याला तळा गेलेला आहे किंबहुना असे नाते शिल्लक राहिलेले नाही . राज्यपाल या अत्यंत जबाबदारीच्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला जर आपल्या पदाची गरीमा राखता येत नसेल , तर ते पद सांभाळण्याची त्यांची कुवत नाही असे समजून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल या पदावरून पदच्युत करत त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी किंवा त्यांनी स्वतःच पदाचा राजीनामा द्यावा. तसेच सदर निवेदनात भाजप चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील ” छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबास पाच वेळा माफीनामे लिहून दिले आहेत ” असे संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांचा व वारंवार राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.  निवेदन देतांना छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, किरण ठाकूर, उज्वल  पाटिल , भीमराव सोनवणे , ज्ञानेश्वर मिस्तरी , आकाश निकम, प्रांजल नेमाडे , कृष्णा जमदाडे , सागर मोतीराडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version