Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपालांनी अंत पाहू नये; आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून अजित पवार संतापले

 

पुणे: वृत्तसंस्था । राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हा संताप व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. राज्यपालांना १२ नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही देण्यात आलं. आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही १७१ आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले.

राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात आल्या आहेत. एवढं सर्व झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत. त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावं लागेल. किती काळ थांबायचं हे विचारलं पाहिजे. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळवेळ मर्यादा आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.

शेतकरी आंदोलनावरून ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींनाही अजित पवार यांनी झापले. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनाला बसले होते. त्यावेळी तुम्हाला मत मांडायला कोणी रोखलं होतं. आता एका पॉप सिंगरने ट्विट केल्याने तुम्हाला जाग कशी आली?, असा सवाल करतानाच परदेशी सेलिब्रिटींनी आंदोलनावर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यात काही गैर नाही. परदेशातही एखादी धक्कादायक घटना घडल्यावर आपण व्यक्त होतोच ना? असा सवालही त्यांनी केला.

यावेळी अजितदादांनी पुणे महापालिका एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट केलं. पुणे पालिकेची निवडणूक गनिमी काव्याने लढणार आहे. त्यासाठी शिवसेना, काँग्रेसशीही चर्चा करण्यात येईल. पुणे पालिकेत मत विभागणी होऊ नये आणि ग्रामपंचायतीसारखं यश मिळावं यासाठी आमचा प्रयत्न असेल, असं सांगतानाच सासूचे दिवस संपलेत आता सुनेचे दिवस आले आहेत. त्यानुसार मतदार विचार करतील, असंही ते म्हणाले.

Exit mobile version