Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपालांना सरकारी विमान नाकारले !

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने सरकारी विमानानं प्रवासाची परवानगी नाकारली यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. राज्यपाल विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला

 

राज्यपाल उत्तराखंडला जात असताना हा प्रकार घडला.

 

“अत्यंत दुर्दैवी प्रकार असून महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमतात असं आपल्या संविधानानं सांगितलं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं विमान वापरायचं असेल तर जीएडीला एक पत्र पाठवावं लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे अशाप्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

 

 

“या सरकारएवढं अहंकारी सरकार मी पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत अहंकार आणणं चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नसून राज्याची आहे. ज्याप्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्याप्रमाणे वागत आहे ते पाहता महाराष्ट्रात यासारखं सरकार आम्ही याआधी पाहिलेलं नाही. पोरखेळ लावला आहे. रस्त्यावरची भांडणं असल्यासारखं राज्य सरकार वागत आहे. यामुळे राज्यपालांचं काही वाईट होणार नाही, पण राज्याची प्रतिमा मलीन होत आहे,” असंही ते म्हणाले आहेत. “जनतेला सर्व समजतं, जनताच याबद्दल निकाल देईल. हे सरकार किती अहंकारी आहे हे आज स्पष्ट झालं आहे,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

Exit mobile version