Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपालांची १२ आमदारांबद्दलची भूमिका देखील महत्त्वाची — पटोले

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । वैधानिक विकास महामंडळांची निर्मिती आणि विदर्भ-मराठवाडा मागास भागाच्या विकासाची संकल्पना आहेच. त्याचप्रमाणे राज्यपालांची १२ आमदारांबद्दलची भूमिका देखील महत्त्वाची आहे. राज्यपाल सगळ्याच पक्षांचे आहेत. कामकाज नियमाने व्हावं अशी विरोधी पक्षनेत्यांची भूमिकाच माझीही आहे.” अशी भूमिका सभागृहात नाना पटोले यांनी मांडली

 

वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या १२ विधानपरिषद आमदारांच्या मंजुरीचा मुद्दा देखील मध्ये आला.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या वेळी राजभवनावर जाऊन घेतलेली शपथ अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असते. त्याच मुद्द्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विरोधकांवर खोचक शेरेबाजी केली. यावेळी विरोधी बाकांवरून गदारोळ झाला आणि नाना पटोलेंना पुन्हा खाली बसावं लागलं. मात्र, त्यांच्या या शेऱ्यामुळे पुन्हा एकदा ‘पहाटेच्या शपथविधी’च्या आठवणी मात्र ताज्या झाल्या!

 

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ-मराठवाड्यासाठीच्या वैधानिक विकास महामंडळांचा मुद्दा चर्चेत आला. विरोधकांनी या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या घोषणेची सरकारला आठवण करून दिली. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून सरकारला प्रश्न विचारला. “उपमुख्यमंत्र्यांनी १५ डिसेंबर २०२० ला संध्याकाळी ४.१५ वाजता विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली होती. त्या घोषणेला आज ७२ दिवस झाले. ती घोषणा अद्याप झाली नाही. पुरवणी मागणीच्या संदर्भात अजित पवारांनी सांगावं की विकासाचा समतोल साधलेला आहे. म्हणजे मग आज रात्री बसून आम्ही ती सगळी आकडेवारी टॅली करून बघू की खरंच विकास झाला आहे किंवा नाही. आणि समतोल विकास नसेलच, तर तसं तरी सांगावं. म्हणजे ती आकडेवारी टॅली करण्याची गरजच पडणार नाही”, असं मुनगंटीवार म्हणाले.

 

दरम्यान, या मुद्द्यावर अजित पवारांनी उत्तर देण्याआधीच विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच मुनगंटीवारांना उत्तर दिलं. “माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की गेल्या ५ वर्षांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा बॅकलॉग वाढला का? याचीही माहिती आपण सभागृहाला दिली पाहिजे”, असं म्हणतानाच मुनगंटीवारांच्या रात्रीच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन “हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात. ते तसं का करतात, मला अजून कळलं नाही” असं पटोले म्हणाले! असं म्हणताच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर काहीसा हशा पिकला!

Exit mobile version