Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी प्रस्ताव पाठवा

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानतर्फे ग्रंथालयांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वागीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. या असमान निधी योजनांचासन २०२०-२१साठी लाभ घेण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांना तो या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.

यानिधीत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालयासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘बाल कोपरा’ स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जामध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालयास दि. ८ जानेवारी, २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन ग्रथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी केले आहे.

Exit mobile version