Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजा ‘उधार’ झाला अन् हाती भोपळा दिला- देवेंद्र फडणवीस

 

 

 

पुणे:: वृत्तसंस्था । राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं.राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते शेतकरी संवाद यात्रेदरम्यान पुण्यात बोलत होते.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मदत दिली जात आहे. मात्र राज्य सरकार पीक विमा कंपनीदेखील अपॉईंट करू शकलं नाही. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसेच मिळाले नाहीत. राज्यात भाजपचं सरकार असताना चार वर्ष प्रधानमंत्री पीक विमा योजना व्यवस्थित राबवण्यात आली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. मात्र आता सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम करत आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी शेतकरी संवाद यात्रेदरम्यान शरसंधान साधलं.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांनी बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावादेखील घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुख्यमंत्र्यांच्याही पुढे गेले. त्यांनी बागायतदारांना दीड लाख रुपयांची मदत देऊ असं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी राज्यातील परिस्थिती आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Exit mobile version